Home राजधानी मुंबई मनोरंजनक्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यासंबंधी सरकारचे नवे पाऊल

मनोरंजनक्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यासंबंधी सरकारचे नवे पाऊल

77

मुंबई  : महाराष्ट्रात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असल्याने मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण असणे काळाची गरज बनली आहे. या क्षेत्रात अनेक रोजगार निर्माण होत असल्याने निश्चित धोरण आणि मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
यासंदर्भात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची 43 वी सर्वसाधारण सभा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेत पार पडली.
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मनोरंजन क्षेत्रातून मोठी भर पडत असून यामध्ये आणखी वाढ होण्यास वाव आहे. यासाठीच पुढील काळात चित्रपट निर्मात्यांना मुंबईबरोबरच राज्यातील इतर चित्रीकरणस्थळांकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महामंडळामार्फत तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये चर्चिले गेलेल्या बाबींचाही मनोरंजन क्षेत्रासाठीचे सर्वंकष धोरण ठरविताना समावेश करण्यात यावा, अशी सूचना मंत्री अमित देशमुख यांनी केली.
महामंडळाने मागील 15 वर्षांची लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली असून अनेक सार्वजनिक उपक्रमांपैकी नफ्यात असलेल्या काही मोजक्या महामंडळापैकी चित्रनगरी हे एक महामंडळ आहे. यापुढील काळातही ही परंपरा कायम असेल. पुढील काळात महामंडळ केवळ आर्थिक पातळीवरच नाही तर धोरणात्मक पातळीवरही महत्त्वाची कामगिरी करेल, असा विश्वासही सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सभेत सन 2019-20 च्या वार्षिक लेख्यांवर चर्चा झाली. सन 2019-20 मधील पाच टक्के इतका लाभांश जाहीर करण्यात आला असून लाभांशाची एकूण रक्कम 1 कोटी 41 लाख इतकी आहे.