Home ब्लॉग विधानसभा अध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीची दमदार वाटचाल

विधानसभा अध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीची दमदार वाटचाल

101

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यावर १ डिसेंबर २०१९ रोजी विधानसभा अध्यक्षपदी श्री. नाना पटोले ( nana patole ) यांची विधानसभेद्वारे बिनविरोध निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्षपदाच्या त्यांच्या कारकीर्दीस एक वर्ष पूर्ण होत आहे. कोरोना संकटाचा एकीकडे तीव्रतेने मुकाबला करीत असताना दुसरीकडे लोकहिताच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार आणि आयोजित केलेल्या बैठका महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

कोरोना काळातील मदतकार्य, भंडारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना नुकसानभरपाई प्राप्त करून देणे, दूधप्रक्रिया प्रकल्प सुरु करणे, महाराष्ट्रातील युपीएससी उत्तीर्ण उमेदवारांचा प्रथमच विधीमंडळात झालेला शानदार गौरव सोहळा, नागपूर विधानभवन येथे कायमस्वरूपी आस्थापना सुरु करणे, ओबीसींना त्यांचे न्याय्य हक्क मिळावे यादृष्टीने सातत्याने पाठपुरावा आणि ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेसाठी विधानसभेत ठराव तसेच गावगाड्यातील महत्त्वाचे घटक असणाऱ्या बाराबलूतेदारांच्या आणि मुस्लीम ओबीसींच्या व्यथावेदना जाणून त्यांना उचित मदत व मार्गदर्शन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र कृषीप्राधिकरण झ्र न्यायालये स्थापन करणे, धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले जाणे आदी महत्त्वाचे लोकहिताचे कार्य हे त्यांच्या एक वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य ठरले.

मार्च अखेरीस कोरोना संकटाचे गांभीर्य लक्षात घेता राज्यात टाळेबंदी लागू झाली. महाराष्ट्रात अन्य राज्यांमधून आलेल्या मजुरांची, कारागिरांची संख्या मोठी आहे. त्यांच्या स्थलांतराचा प्रश्न तसेच महाराष्ट्रातून अन्य राज्यात काही तात्कालिक कामानिमित्त गेलेल्या आणि टाळेबंदीमुळे तेथेच अडकून पडलेल्या कुटुंबांचाही प्रश्न त्यावेळी तीव्र होता. लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी तातडीने पावले उचलत विधान भवन, मुंबई येथे राज्ययंत्रणेच्या समन्वयासाठी नियंत्रण आणि मदत कक्ष कार्यान्वित केला. श्री. नाना पटोले आणि विधान परिषदेचे सभापती श्री. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षातर्फे राज्यातील सर्व विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सन्माननीय सदस्यांशी संपर्क साधत त्या-त्या मतदार संघात अडकलेले अन्य राज्यातील रहिवासी, मजूर आणि त्या-त्या मतदार संघातील अन्य राज्यात प्रवासानिमित्त गेलेले आणि टाळेबंदीमुळे तेथेच अडकलेली कुटुंबे यांचा तपशील गोळा करण्यात आला. त्यांच्याशी संपर्क आणि समन्वय साधून आपल्या राज्याचे पोलीस महासंचालक आणि नियंत्रण कक्ष यांना तसेच अन्य राज्यातील विधान मंडळ सचिवालयांना ही माहिती उपलब्ध करून देत दोन्ही बाजूचे स्थलांतर सुकर करण्यात आले. मागील आठवड्यात २५ व २६ नोव्हेंबर २०२० रोजी केवडिया, गुजरात येथे देशातील सर्व राज्यांचे पीठासीन अधिकारी यांची ८० वी परिषद लोकसभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली, त्या परिषदेतील ह्य सुदृढ लोकशाहीसाठी विधान मंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका या तीन स्तंभांमधील आदर्श समन्वय या विषयावर आयोजित चर्चासत्रात विचार मांडतांना श्री. पटोले यांनी वरील माहिती सर्वांना अवगत केली. उचित समन्वयासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रशिक्षण आणि अभ्यासाची आवश्यकता स्पष्ट करताना, नागपूरचे भौगोलिक स्थान देशाच्या मध्यवर्ती असल्याने आणि नागपूर येथे विधान भवन, रविभवन, आमदार निवासाची सुविधा तयार असल्याने नागपूर येथे लोकसभा सचिवालयाने बीपीएसटी ब्युरो ऑफ पार्लमेंटरी स्टडी अँड ट्रेनिंगचे केंद्र उभारावे, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. त्यांच्या या प्रस्तावाचे स्वागत करण्यात येत आहेत.

जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सदैव तत्पर आणि विकासकामांच्या जलद अंमलबजावणीसाठी प्राप्त होणाऱ्या सूचना, विनंत्यांचे खुल्या दिलाने स्वागत, हा विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांचा स्वभावधर्मच आहे. त्यामुळे केवळ विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या कोणत्याही भागातील, कोणत्याही स्तरातील सामान्य कार्यकर्ता त्यांच्यापर्यंत पोहोचून समस्या, अडचणी मांडू शकतो. संसदीय लोकशाहीतील या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी खांद्यावर घेत असताना बळीराजाचे हितसंरक्षण आणि त्या बरोबरीने समाजातील शोषित-वंचित-पीडित घटकांना दिलासा देणे, हेच माझ्या समोरील उद्दिष्ट्य असेल, अशी भावना त्यांनी विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यावर सर्वांचे आभार मानताना व्यक्त केली होती. वर्षभरातील त्यांचे बहुआयामी कार्य आणि योगदान लक्षात घेता याच उद्दिष्ट्यपुर्तीची त्यांची तळमळ त्यातून दिसून येते. आजच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीच्या वर्षपूर्तीनिमित्त यापुढील वाटचालीसाठी त्यांना आपणा सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा…

निलेश मदाने
मा. विधानसभा अध्यक्षांचे विशेष कार्य अधिकारी
जनसंपर्क अधिकारी, विधान भवन
संचालक, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र