दिलीपकुमार यांच्याविषयी ‘हे’ जाणतायं…

मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य

‘वो शादी के रास्ते चली गयी और मैं बरबादी के’ असे दु:ख त्यांनी ‘देवदास’मध्ये व्यक्त केले. ‘भाई के मौत के सायेमें बहेन शादी रचाये, तो लोग क्या कहेंगे?’ अशी खंत ‘दिल दिया दर्द लिया’मध्ये समाजापुढे मांडली.

Abhivrutta R & D

दोन ते तीन दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेत्री सायराबानू यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त करत सर्वांनी त्यांच्या प्रकृतीविषयी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.
याशिवाय त्यांनी यंदाच्या वर्षी दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांचे निधन झाल्यामुळे त्यांनी 11 आॅक्टोबर रोजी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला नसल्याचे म्हटले होते. कोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. आम्ही आमचे मित्र, कुटुंबियातील व्यक्तींना विनंती करतो की, सर्वांनी एकमेकांची काळजी घ्यावी. देव आपल्या सर्वांचे रक्षण करो, असे म्हटले होते.
आणि खरोखरच त्या आपल्या पतीची अतिशय काळजी घेत असल्याचे दिसून येते. मागील काही महिन्यांपासून दिलीपकुमार यांची प्रकृती ठीक नसून अनेकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
…तर त्यांच्याविषयी बोलावे तितके कमीच आहे. दिलीपकुमार नावाचा अवलिया, त्यांच्या नावाप्रमाणेच आवाजातही जादू. या हरहुन्नरी कलाकाराने चित्रपटसृष्टी गाजवली. ‘और वो थी भी क्या? जमीनके बराबर और इन्सान अगर जमीनपे पाव न रख्खे, तो कहाँ रख्खेगे शेटजी?’ असं ते ‘फूटपाथ’मध्ये म्हणाले होते. ‘वो शादी के रास्ते चली गयी और मैं बरबादी के’ असे दु:ख त्यांनी ‘देवदास’मध्ये व्यक्त केले. ‘भाई के मौत के सायेमें बहेन शादी रचाये, तो लोग क्या कहेंगे?’ अशी खंत ‘दिल दिया दर्द लिया’मध्ये समाजापुढे मांडली. ‘अरे थुंक देना उसके मुँहपे जो बातपे पलट जाये’ अशा शब्दांत ते ‘नया दौर’मध्ये गरजले. यावेळी दिलीपकुमार पडद्यापेक्षा मोठे झाले आणि त्यांचे चित्रपट त्यांच्या भूमिकेपेक्षा मोठे झाले.
नुकतीच मिसरूड फुटलेली पिढी त्याच्या अभिनयदर्शनाने अवाक झाली. बैराग, अंदाज, मशाल , शक्ती, विधाता, दुनिया यासारखे एकापेक्षा एक चित्रपट केले. दिलीपजींच्या अभिनयाची दखल खुद्द राज कपूर यांनी घेतली. शक्तीपाहून आल्यानंतर राज कपूर यांनी दिलीपजींना पुष्पगुच्छ पाठवून एका पत्रात लिहिले होते, ‘बादशहा हा नेहमीच बादशहा असतो…’
दिलीपकुमार १९४० साली पुण्यात आले. एक पारशी कॅफेचा मालक आणि अँग्लो-इंडियन जोडप्याच्या मदतीने त्या कॅफेचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला. इंग्रजी भाषेची जाण आणि उत्तम लेखन कौशल्यामुळे त्यांना तेथे नोकरी मिळाली. त्यांनी पुण्याच्या आर्मी क्लबमध्ये सँडविच स्टॉल सुरू केला. तेथील कॉन्ट्रॅक्ट संपताच पाच हजार रुपये खिशात घेऊन ते मुंबईला आले.
सन १९४२ मध्ये एक छोटा व्यवसाय सुरू करावा असा विचार त्यांनी केला. ते चर्चगेट येथील डॉ. मसानी यांना भेटले. त्यांनी दिलीपकुमार यांना मालाडच्या बॉम्बे टॉकिजमध्ये काम करण्यास सुचविले. बॉम्बे टॉकिजची मालकीण देविका राणी यांच्याशी त्यांची भेट झाली. देविका राणीने त्यांना सुरुवातीला ४०० रुपये दरमहा मानधनावर काम करण्याची आॅफर दिली. याचवेळी ज्येष्ठ अभिनेते अशोककुमार यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यांनी दिलीपकुमार यांना नैसर्गिक अभिनय करण्याचा सल्ला दिला. तिथेच दिलीपकुमार यांना शशिधर मुखर्जी भेटले. देविका राणीने युसूफ खान यांना त्यांचे नाव दिलीपकुमार असे करावे, असे सूचविले.

काही लोकप्रिय चित्रपट
ज्वारभाटा, अंदाज, बाबुल, दीदार, आन, दाग, देवदास, आझाद, नया दौर, यहुदी, मधुमती, कोहिनूर, मुघल-ए-आझम, गंगा-जमुना, राम और शाम, क्रांती, शक्ती, कर्मा, सौदागर, किला

याच नावाने त्यांनी १९४४ साली ‘ज्वारभाटा’ या पहिल्या सिनेमात काम केले आणि दिलीपकुमार नावाचा रुपेरी पडद्यावरील अभिनय प्रवास सुरू झाला.
दिलीपकुमार यांनी बॉम्बे टॉकीजनिर्मित ‘ज्वारभाटा’तून १९४४ साली हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. सहा दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी हिंदी सिनेमाला अभिनयाच्या माध्यमातून गौरवाच्या शिखरावर नेले. सुमारे ६० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका केल्या.
ऐतिहासिक सलीम ही राजकुमाराची व्यक्तिरेखा अजरामर करणारे दिलीपकुमार प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले ते ‘मुघल-ए-आझम’ (१९६०) यातील सर्वोत्तम अभिनयाने. त्यानंतर ‘गंगा-जमुना’(१९६१) आणि ‘राम और श्याम’ (१९६७) यातही त्यांनी अनुक्रमे डाकू आणि हलकी फुलकी भूमिका केली. आपल्या संपन्न अभिनयाबद्दल त्यांना आठ वेळा फिल्म फेअर पुरस्काराने गौरविण्यात आले.
१९७६ नंतर दिलीपकुमार यांनी पाच वर्षे अभिनयापासून विश्रांती घेतली. आणि पुनरागमन केले ते ‘क्रांती’ (१९८१) या चित्रपटातून. त्यानंतर ‘शक्ती’ (१९८२), ‘कर्मा’ (१९८६), ‘सौदागर’ (१९९१) चित्रपटातून वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. ‘किला’ (१९९८) हा त्यांनी शेवटचा चित्रपट केला. त्यानंतर ते मोठ्या पडद्यावर दिसले नाहीत.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *