महाआवास अभियानांतर्गत १५ डिसेंबर रोजी राज्यात ‘घरकुल मंजुरी दिवस’

राजधानी मुंबई

मुंबई : ‘महाआवास अभियान-ग्रामीण’अंतर्गत राज्यात येत्या 15 डिसेंबर हा दिवस ‘घरकुल मंजुरी दिवस’ म्हणून तर 20 डिसेंबर हा दिवस ‘प्रथम हप्ता वितरण दिवस’ म्हणून अंमलबजावणी करण्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषित केले आहे.

राज्यात 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या 100 दिवसांच्या कालावधीत ‘महाआवास अभियान-ग्रामीण’ राबविण्यात येत आहे. याचा मंत्री मुश्रीफ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), गटविकास अधिकारी (पंचायत समिती) सहभागी झाले होते.

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी अभियानातील आतापर्यंतची प्रगती बघता अभियान काळात आठ लाख घरकुले पूर्ण करावयाची असल्याने प्रथम 100 टक्के मंजुरी व पहिला हप्ता वितरणावर लक्ष केंद्रित करावयाच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या. विशेषत: त्यातील 100 टक्के घरकुल मंजुरी व मंजूर घरकुलांना पहिला हप्ता या उपक्रमांवर 15 डिसेंबर व 20 डिसेंबर पर्यंत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. अभियान 100 दिवसांत यशस्वी करावे, असे आवाहनही मंत्र्यांनी यावेळी केले.

ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाचे संचालक डॉ. राजाराम दिघे, कोल्हापूर जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पुणे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, राज्य व्यवस्थापन कक्षाचे उपसंचालक निलेश काळे, उपसंचालक मंजिरी टकले, सहाय्यक संचालक संतोष भांड व राज्य समन्वय राम आघाव उपस्थित होते.

प्रतिकात्मक छायाचित्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *