Home उपराजधानी नागपूर प्रशिक्षण शिबिरातून पोलिस दलात दाखल होण्याची सुवर्णसंधी

प्रशिक्षण शिबिरातून पोलिस दलात दाखल होण्याची सुवर्णसंधी

48

नागपूर : ग्रामीण भागातील तरुण -तरुणींना तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण माहिती मिळावी, या हेतूने पोलिस भरती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, राज्य शासनाच्या भरतीमध्ये जास्तीत-जास्त स्थानिक युवक-युवतींची निवड व्हावी. यासाठी सर्वांनी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
काटोल व कोंढाळी येथे शुक्रवारी भरती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमात गृहमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी आरती देशमुख, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, उप विभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव, सुभाष कोठे, सतीश रेवतकर, नरेश अडसरे आदी उपस्थित होते.

कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. तरीही राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या अटी व शर्तींचे पालन करून राज्यात साडेपाच हजारापेक्षा जास्त जागांवर पोलीस शिपाई भरती करण्याचे नियोजन केले. त्या भरती प्रक्रियेत स्थानिक युवक व युवतींचा सहभाग वाढावा. त्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य पोलीस दलात निवड होण्यासाठी मैदानी आणि लेखी परीक्षेची उत्तम तयारी करावी. जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा आणि पोलिस दलात निवड होण्यासाठी हीच सुवर्णसंधी आहे. त्या संधीचे सोने करण्याचे आवाहनही गृहमंत्री देशमुख यांनी केले.

कोंढाळी व काटोल येथे शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यासोबतच नरखेड, भारसिंगी आणि थडीपवनी या ठिकाणी भरतीपूर्व तयारी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे प्रत्यक्ष भरती प्रक्रियेची माहिती होईल. निवड होताना या शिबिराचा लाभ होईल. याशिवाय 30 टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत, याचा मुलींना लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्यातील पोलिस दलात 12 हजार 500 पदांची भरती करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात 5 हजार 858 जागा भरल्या जाणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र पोलीस दलाने कोरोनाकाळात उत्तम काम केल्याचे सांगून या काळात 296 पोलिस कर्मचारी शहीद झाल्याचे त्यांनी सांगितले.

100 एकर जागेच्या परिसरात इसासनी येथे शासकीय जागा मिळाली आहे. काटोल, नरखेड, कोंढाळी आणि बाजारगाव ठाण्याची कामे करण्यात येणार आहेत. नागपूरची मेट्रो आगामी काळात काटोल, नरखेडपर्यंत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘शक्ती’ कायद्याचे प्रारुप तयार करण्यात आले असून, यामाध्यमातून महिलासंदर्भातील गंभीर गुन्ह्यासंदर्भासाठी दोषीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील मुली -महिला सुरक्षित वावरतील, असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी आरती देशमुख यांनीही उपस्थित युवक – युवतींना शुभेच्छा दिल्या.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भरती प्रक्रियेबाबत मैदानी व लेखी परीक्षेबाबत माहिती दिली. जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी ठेवा़ संपूर्ण ताकदीने तयारीला लागा, असे आवाहन उप विभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव यांनी केले. प्रशिक्षक शिबिरात वाय. एम. मडावी, ए. एम. रामटेके, ए. यू.पवार , एस. बी. कुथे, बी. एस. शुक्ला, अक्षय ठाकरे, मनीष ठाकरे, प्रवीण टोंग, माणिक उसंडी, विजय कुंभलकर, गुरुदेव खोब्रागडे, गणेश चौके, प्रसाद रुचके, राहुल तायडे, नितीन सोनटक्के, श्रीधर झाडे व चंद्रशेखर मसराम असे एकूण 20 प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत. मराठा लॉन्सर्स, विदर्भ युथ क्रीडा मंडळ व राजूज जिम, काटोल आणि कोंढाळी येथे साहस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here