नागपूर पाणीपुरवठा कंत्राट कामाच्या चौकशीचे आदेश

उपराजधानी नागपूर राजधानी मुंबई

नागपूर / मुंबई : नागपूर शहराला शुद्ध आणि चोवीस तास पाणी मिळण्यासाठी योग्य पद्धतीने उपाययोजना करण्यात यावी. चोवीस तास पाणी पुरवठा राबविण्यासाठी कंत्राट दिलेल्या कंपनीच्या कामासंदर्भात अहवाल तयार करून चौकशी करण्यात यावी. यासंदर्भात विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

विधानभवन येथे नागपूर शहराला 24 बाय 7 तास पाणीपुरवठा करण्यासाठी कंत्राट दिलेल्या कंपनीच्या कामकाजासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस नागपूरचे पालकमंत्री तसेच ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, नागपूरचे आयुक्त बी. राधाकृष्णन, नगरविकासचे उपसचिव सतिश मोघे, उपसचिव पी.जी. जाधव, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, आमदार विकास ठाकरे, नगरसेवक संजय महाकाळकर, प्रफुल्ल गुडधे, वेदप्रकाश आर्य, दुतेश्वर पेठे आदींसह नगरविकास विभागाचे आणि नागपूर महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी २४ तास पाणीपुरवठा कराराच्या अंमलबजावणी संदर्भात सांगितले, आॅरेंज सिटी वॉटर कंपनीने करारानुसार करावयाच्या कामांना विलंब केला. करारानुसार तांत्रिक कार्यक्षमता पहिल्या 10 वर्षांत 75 टक्के तर व्यावसायिक कार्यक्षमता १० वर्षात ९५ टक्के होणे आवश्यक होते मात्र, या कालावधीत वाढ करून १५ वर्षे करण्यात आला आहे. याचबरोबर करारनाम्यानुसार योजनेवर खर्च करण्यात आला नसल्याने त्याचा फायदा संबंधित कंपनीस झाला आहे. यामुळे जनतेच्या पैशांचा अपव्य झाला असल्याचे माहिती पालकमंत्री डॉ.राऊत यांनी सांगितले.

नागपूर शहराला २४ तास पाणीपुरवठा राबविण्यासाठी कंत्राट दिलेल्या आॅरेंज सिटी वॉटर कंपनीच्या करारातील निकष, योजना राबविण्यासाठी झालेला विलंब या सर्व बाबी तपासून पहाव्यात व यामध्ये काही अनियमितता झाली आहे का याची पडताळणी करून अहवाल सादर करावा. नागपूरवासियांना २४ तास पिण्यासाठी चांगल्या प्रतीचा पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी प्रयत्न व्हावेत, असेही अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *