मुंबई : नागपूर येथील मेडिट्रीना मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीसंदर्भात तातडीने चौकशी करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
नागपूर येथील मेडिट्रीना मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत गैरव्यवहारप्रकरणी तक्रारीसंदर्भात विधानभवन येथे बैठक झाली. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार विकास ठाकरे, राजू पारवे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत बोगस रुग्ण दाखवून पैसे उकळणे याबाबत गुन्हा दाखल व्हावा. तसेच, रुग्णालयाचा परवाना रद्द करावा अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी केली. मेडिट्रीना शासनाच्या विविध योजनांतर्गत अनेक रुग्णांच्या नावे रकमेची उचल करून रुग्णांकडूनही रक्कम वसूल केल्याप्रकरणीच्या तक्रारींची संबंधित विभागाने तातडीने चौकशी करावी, असे निर्देशही श्री. पटोले यांनी दिले.