Home राजधानी मुंबई देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात

55

मुंबई : महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात या विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. विधेयक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आले आणि त्यास दोन्ही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली, असल्याने येत्या शैक्षणिक वषार्पासून या विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेसह अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री सुनिल केदार ( sports minister sunil kedar ) यांनी पत्रपरिषदेत दिली.

विद्यापीठ स्थापनेनंतर प्रथम वर्षी स्पोर्टस सायन्स, स्पोर्टस टेक्नॉलॉजी व स्पोर्टस कोचिंग व ट्रेनिंग हे ३ अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. याकरिता प्रत्येक अभ्यासक्रमात ५० विद्यार्थी प्रवेश संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील वर्षामध्ये मागणीनुसार व आवश्यकतेनुसार आणखी अभ्यासक्रम सुरू करता येतील. यामुळे शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम व कम्युनिकेशन, क्रीडा प्रशिक्षण यामध्ये शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, क्रीडा क्षेत्रातील तांत्रिक मनुष्यबळ देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. शारीरिक शिक्षण, क्रीडा शिक्षण यामध्ये संशोधन व विकास चांगल्या प्रकारे होईल असेही मंत्री केदार यांनी सांगितले.

राज्यात सध्या पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा संकुल सुरू आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. या सुविधांचे अद्ययावतीकरण तसेच नवीन सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सातत्याने होत असते. यामुळे हे विद्यापीठ सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे व नंतरच्या कालावधीत या विद्यापीठाकरिता स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात येईल. यासाठी अनावर्ती खर्च रु. २०० कोटी व विद्यापीठ कॉर्पस फंडसाठी २००.०० कोटी असू एकूण ४०० कोटी रु.खर्च अपेक्षित असल्याचे श्री़ केदार यांनी सांगितले.

अनेक देश क्रीडा क्षेत्राकडे व्यापक दृष्टीकोन ठेवून शालेय शिक्षणाबरोबर खेळाला महत्त्व देत आहेत. महाराष्ट्राचाही विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यामागे आॅलिम्पिक सामन्यांचे लक्ष ठेवण्यात आले आहे. आॅलिम्पिकसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जास्तीत जास्त सुवर्णपदके मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकही आमंत्रित करण्यात येतील. राज्याची क्रीडा विषयक कामगिरी आणखी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे विचारात घेऊन क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या, प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार प्रशिक्षक तसेच, खेळाडू निर्माण व्हावेत, हा आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश असल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here