Home राजधानी मुंबई महानेट यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन

महानेट यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन

69

मुंबई : सीएम डॅशबोर्ड, माय गव्ह अ‍ॅप, मुख्यमंत्री हेल्पलाईन आणि तक्रार निवारण पोर्टल अधिक सक्षम करून राज्य शासनाच्या सर्व विभागांना सहज उपयोग करण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( cm udhhava thakare) यांनी दिले. या व्यवस्थेवर मुख्यमंत्री सचिवालयाची देखरेख राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा आढावा घेतला. तसेच, महानेटद्वारे ग्रामीण भागातील शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर्स यांच्याशी संवाद साधला. यावेळी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवासन, व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, संचालक रणजित कुमार उपस्थित होते.

मुख्यमंत्री यावेळी वर्धा जिल्ह्यातीला कारंजा तालुक्यातील धवसा ग्रामपंचायत येथे महानेटद्वारे दूरदृश्य प्रणालीतून शेतकºयांशी बोलले. तसेच, महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभाविषयी विचारले. चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षकांना ई लर्निंगविषयीच्या अनुभवांविषयी विचारणा केली. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग हा सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुधारणे, त्यांना उत्तम सोयीसुविधा आणि सेवा मिळणे यासाठी व्हावा, त्याकरिता तितकी सक्षम तांत्रिक यंत्रणा असली पाहिजे याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. आवश्यक ते मनुष्यबळ यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्य सचिवांना दिले.

महानेट जितके प्रभावी होईल तितकी संपर्क यंत्रणा सशक्त होईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी विशेषत: भारत नेटसाठी केंद्राकडून येणारा २ हजार २९० कोटी रुपये निधी लवकरात लवकर मिळावा म्हणून पाठपुरावा करण्यास सांगितले.