Home उपराजधानी नागपूर ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य यांचे निधन

74

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, ज्येष्ठ संपादक, विचारवंत मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांचे आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मूळ वर्धा जिल्ह्यातील असलेले मा.गो. वैद्य यांची कर्मभूमी नागपूर राहिले आहे. मॉरिस कॉलेजमध्ये असताना सन 1943 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. 1948 साली महात्मी गांधी यांच्या हत्येनंतर संघावर बंदी आली, त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले. याशिवाय त्यांनी संघाच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाºया सांभाळल्या आहेत.
त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्ञानदीप मालवला : राज्यपाल
मुंबई : महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ विचारवंत व तरुण भारतचे माजी संपादक मा. गो. वैद्य यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. द्र्रष्टे विचारवंत, संपादक, निर्भिड लेखक व जाज्वल्य राष्ट्रप्रेमी मा. गो. वैद्य यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दु:ख झाले. श्री. वैद्य यांनी आपल्या विचारांमधून तसेच प्रखर लेखणीतून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर समाजाचे सातत्यपूर्ण प्रबोधन केले. निष्ठावान स्वयंसेवक असलेल्या मा. गो. वैद्य यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारधन जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेचले. ‘तरुण भारत’चे संपादक असलेल्या वैद्य यांनी पत्रकारांच्या अनेक पिढ्या घडवल्या. त्यांच्या निधनाने विदर्भातील ज्ञानदीप मालवला आहे. श्री. वैद्य यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.