Home उपराजधानी नागपूर महाराष्ट्राची भाग्यरेषा : कोयना जल वीज प्रकल्प

महाराष्ट्राची भाग्यरेषा : कोयना जल वीज प्रकल्प

122

सह्याद्रीच्या पोटातून बोगदे काढून हे पाणी, पोटातच गुहेप्रमाणे खोदलेल्या भल्यामोठ्या पॉवरहाऊसपर्यंत जाते व टर्बाईन्स फिरवून मग दुसºया बोगद्याने पुढे जाऊन कोकण बाजूला उतरते व मग पश्चिम वाहिनी वसिष्ठी नदीतून वाहत जाऊन अरबी समुद्रात जाते. म्हणजे नदीचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे उलटा फिरवलेला आहे. हे कोयना प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे.

भाग दुसरा


जलविद्युत केंद्र्रात आवश्यक असलेली अत्यंत अनुकूल भूरचना या क्षेत्राला लाभलेली आहे. अरबी समुद्रापासून केवळ 56 किलोमीटर म्हणजेच 35 मैल अंतरावर असलेल्या पोफळी येथे पूर्वेच्या बाजूस सह्याद्रीच्या रांगांवरून वाहणाºया कोयनेचे पात्र समुद्र सपाटीपासून 579 मीटर (1900 फूट) उंचावर आणि विद्युत केंद्रापासून बाहेर पडणारे पाणी समुद्राला मिळण्यासाठी पश्चिमेच्या बाजूला 500 फुटांचा उतार अशा प्रकारच्या नैसर्गिक भूरचनेमुळे अत्यंत कमी खर्चात विद्युत निर्मितीसाठी फार महत्त्वाची असणारी जलस्तंभाची प्रचंड मोठी उंची प्राप्त झालेली आहे. ज्या खडकांमधून बोगदे खोदावे लागणार होते, ते लाव्हारसपासून बनलेले उत्कृष्ट प्रतीचे कातळ होते. म्हणून त्यांच्या या अत्यंत कठीणपणाचा आणि मजबूतीचा फायदा घेता आला आणि प्रचंड दाबाचे पाणी विद्युत गृहात आणण्यासाठी लागणाºया जलवाहिन्यांवर येणारा दाब काही प्रमाणात जलवाहिनीच्या पोलादी भागावर आणि उरलेला दाब खडकांवर विभागला गेला. त्यामुळे पोलादाच्या जाडीमध्ये तसेच त्यांची लांबी सुद्धा कमी झाल्यामुळे खर्चामध्ये भरघोस काटकसर झाली आणि निव्वळ काटकसरीसाठीच कोयना विद्युत गृहाची रचना भूगर्भात केली गेली.

कोयना धरणाची रचना 2796.5 दशलक्ष घनमीटर (105250 दशलक्ष घन फूट) पाणी साठविण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे. यापैकी 2 हजार 500 दशलक्ष घनमीटर पाणी हे शेतीसाठी राखून ठेवले आहे. या प्रकल्पाच्या विस्तारासाठी चार टप्पे योजिले आहेत. पहिल्या आणि दुसºया टप्प्यात मिळून पोफळी येथे जलविद्युत केंद्र्राची उभारणी केली असून 70 मेगावॅटचे एक असे चार आणि 80 मेगावॅटचे एक असे आणखी चार अशा तºहेने एकूण आठ विद्युत निर्मिती संच कार्यान्वित केलेले असून हे एकूण 600 मेगावॅटचे केंद्र 60 टक्के लोड फॅक्टरचे ‘बेसलोड स्टेशन’ म्हणून कार्यरत आहे.

पहिल्या आणि दुसºया टप्प्यातील विद्युत निर्मितीनंतरचे पाणी समुद्र्रसपाटीपासून 133.2 मीटर (437 फूट) उंचीवर अवजल भूयारातून बाहेर पडते. समुद्रात विलीन होण्यापूर्वी या पाण्यातील शेष शक्तीचा उपयोग करून घेण्यासाठी वैतरणी नाल्याच्या पात्राशेजारीच असलेल्या कोळकेवाडी दरीमध्ये एक छोटे धरण बांधण्यात आले आहे. या कोळकेवाडी धरणाच्या पायथ्या लगतच्या भूगर्भात एक विद्युत निर्मिती केंद्र्र उभारून 80 मेगावॅटचे एक असे चार वीज निर्मिती संच कार्यान्वित केले आहेत. 24 टक्के लोड फॅक्टर असलेले हे केंद्र्र अत्याधिक विद्युत मागणीच्या वेळात चालविण्यासाठी योजिलेले आहे. कोयना जल विद्युत केंद्राच्या चौथ्या टप्प्यात 250 मेगावॅटचे एक अशी 4 जनित्रे बसविण्यात आली आहेत. चौथा टप्पा चालूकेल्याने पोफळीचे टप्पा 1 व 2 वीज निर्मिती केंद्र हे अत्याधिक विद्युत मागणीच्या वेळात चालवण्यासाठी रुपांतरित करण्यात आले आहेत.

सर्वाधिक विजेची अपेक्षित वाढीव दैनंदिन गरज लक्षात घेऊन कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याची आखणी ही काळाची गरज ठरली आहे. टप्पा 4 या योजनेत सध्याचेच पाणीवापराण्यात येत असल्याने त्यासाठी वेगळे धरण बांधण्याची गरज भासली नाही. या प्रकल्पाची उभारणी टप्पा 1 व 2 प्रमाणेच असून सह्याद्रीच्या कुशीतील कोळकेवाडी धरणाजवळ निर्माण करण्यात आले आहे. या वीजगृहात 250 मेगॅवॅट क्षमतेची 4 जनित्रे बसविण्यात आली असून त्यामुळे 1000 मेगॅवॅट वीजनिर्मितीची क्षमता वाढली आहे. या विद्युतनिर्मितीसाठी उपयोगात आलेले पाणी कोळकेवाडी धरणाच्या जलाशयात सोडण्यात येते.

मुख्यमंत्री ठाकरेंकडून पाहणी
प्रकल्पाच्या या चौथ्या टप्प्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नुकतीच भेट दिली. या प्रकल्पाविषयीची माहिती तेथील अभियंत्यांकडून जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाविषयीची उत्सुकता ही त्यांनी प्रकल्पातील ड्राफ्टट्यूबविषयी माहिती घेताना स्वत:च्या मोबाईलचा फ्लॅशद्वारे पाहणी केल्यावर दिसून आली. कोयना विद्युत प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी दिली.

कोयना विद्युतप्रकल्प हा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामार्फत चालविला जातो. हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी तसेच देशासाठी महत्त्वाचा प्रकल्प असल्याने या प्रकल्पाचे संरक्षण व प्रकल्पाची काळजी ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या आधुनिकीकरण व विकासासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी मदतीसाठी खंबीर पणे उभे आहे. (समाप्त)

प्रवीण डोंगरदिवे
माहिती सहाय्यक
विभागीय माहिती कार्यालय,
कोकण विभाग, नवी मुंबई

(सौजन्य महासंवाद)