शालेय खेळाडूंसाठी गोल्फ मैदान विकसित करा :  सुनील केदार

उपराजधानी नागपूर

नागपूर : विभागीय क्रीडा संकुल येथील सिंथेटिक ट्रॅकजवळील जागेवर ह्यगोल्फ ग्राऊंडह्ण विकसित कराण्यात यावे. यामुळे शहरातील शालेय खेळाडूंना सुविधा उपलब्ध होऊन राज्य तसेच राष्ट्रीय गोल्फर निर्माण होतील, असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षांमध्ये विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक श्री. केदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश भोयर आदी यावेळी उपस्थित होते. क्रीडा संकुलातील चालू असलेली कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावी. 400 मीटरचा ॲथलेटीक रनिंग ट्रॅक आणि युथ होस्टेलचे काम ताबडतोब पूर्ण करण्यात यावे. तसेच क्रीडा संकुल समितीमार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग यांना वसतिगृहाचे नुतनीकरण व दुरुस्ती याबाबत 2 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहे. हे काम अंतिम टप्यात आले असून ते त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.

विभागीय क्रीडा संकुलाची भाडेपट्ट्याची मुदत 2015 मध्ये संपली होती. जिल्हाधिकारी यांनी 15 वर्षासाठी भाडेपट्टा मिळण्याबाबचा प्रस्ताव महसूल व वनविभाग यांच्याकडे नुतनीकरणासाठी पाठविला आहे. यामध्ये 15 वर्षाऐवजी 30 वर्षाचा भाडेपट्टा नुतनीकरणासाठी पाठवावा. तसेच क्रीडा संकुलातील क्रीडा वसतिगृह, युवा वसतिगृह, व पॅव्हेलियन इमारतीवरील मोकळ्या जागेवर पॅनल लावून 160 किलो वॅटचा सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी श्री.केदार यांनी संबंधितांना निर्देश दिले.

क्रीडा संकुलाच्या पश्चिमेकडील सिथेंटिक रनिंग ट्रॅक व अन्य क्रीडा सुविधांसाठी संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला 33 लाख रुपये देण्यात आले आहेत. याबाबतची निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करुन कामाला सुरुवात करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या. क्रीडा संकुलाच्या बाजूला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यक्षेत्रातील प्रादेशिक मनोरुग्णालयाची जागा आंतरराष्ट्रीय दर्जाची बॅडमिंटन अकादमी उभारण्यासाठी उपलब्ध करुन देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. शहरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन खेळाडू आहेत. शहराचे नावलौकिक वाढविण्यासाठी व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी बॅडमिंटन अकादमी असणे गरजेचे असल्याचे श्री. केदार यांनी यावेळी सांगितले.

क्रीडा संकुल येथे जलतरण तलाव घेण्याबाबत यावेळी प्रस्ताव समितीसमोर सादर करण्यात आला. उपसंचालकांनी शहरातील सर्व जलतरण तलावांच्या ठिकाणी भेटी देऊन त्यांचे व्यवस्थापन कशाप्रकारे करण्यात येते, त्यांचा खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ, आजवर तयार झालेले खेळाडू याबाबतचा अहवाल तयार करुन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. राज्याच्या क्रीडा धोरणानुसार विभागीय मुख्यालयात ह्यअस्ट्रो टर्फ हॉकी मैदानह्ण तयार करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. क्रीडा संकुलातील प्रकल्पातंर्गत ह्यनिरीह्णमार्फत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून क्रीडा संकुलाला दररोज एक लक्ष लीटर ह्यगार्डन वॉटरह्ण प्राप्त होऊ शकते. या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून घ्यावा व प्रकल्प त्वरित पूर्ण करावा, असेही ते यावेळी म्हणाले.

मौजा हरपूर येथे कामगार कल्याण विभागाचे अर्धवट स्थितीतील क्रीडा संकुल आहे. यासाठी 50 कोटी उपलबध करुन द्यावे. हे संकुल पूर्ण झाल्यानंतरच क्रीडा विभागाने ताब्यात घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या गावठाणाच्या आतील व गावठाणाबाहेरील अतिक्रमण नियमित करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. हे अतिक्रमण 25 जानेवारीपर्यंत नियमित करुन जमिनीचे पट्टे वाटप करण्याचे निर्देश संबंधितांना यावेळी देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *