Home उपराजधानी नागपूर ताजाबाद परिसरातील दुकानदार-प्रशासक वादावर जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढावा :  पालकमंत्री 

ताजाबाद परिसरातील दुकानदार-प्रशासक वादावर जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढावा :  पालकमंत्री 

71

नागपूर : न्यायालयीन प्रक्रिया वगळता अन्य आक्षेपांचे निराकरण करण्यासाठी ताजाबाद परिसरातील नागरिक व दुकानदार तसेच ताजुद्दीन ट्रस्ट ताजाबाद या ठिकाणी नियुक्त असणाऱ्या प्रशासकांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन प्रलंबित विषयांवर तोडगा काढावा, असे निर्देश ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत [ dr niteen raut ] यांनी दिले आहेत.

हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट ताजाबाद परिसरातील दुकान वाटपासंदर्भात दुकानदार व नागरिकांच्या अन्याय झाल्याच्या भावना आहेत. या ठिकाणी दुकानांचे वाटप लॉटरी पद्धतीने करण्यात आले आहे. 108 दुकानांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र 14 प्रकरणी गुंता कायम आहे. त्यामुळे यासंदर्भात पालकमंत्री महोदयांनी हस्तक्षेप करावा, असे आवाहन परिसरातील नागरिकांनी व दुकानदार यांनी केले होते.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे या संदर्भात काल सोमवारी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विशेष बैठक आयोजित केली होती. यावेळी ताजाबाद परिसरातील नागरिक व दुकानदार उपस्थित होते. सोबतच बैठकीला आमदार राजू पारवे, आमदार टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर ताजाबाद ट्रस्टवर प्रशासक म्हणून काम करीत असलेले निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश गुणवंत कुबडे उपस्थित होते.

या प्रकरणातील काही दुकानदार न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कोणताही हस्तक्षेप न करता अन्य विषयांवर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्वतंत्र बैठक घेऊन तोडगा काढण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. महापालिका आयुक्तांनी देखील या प्रकरणात लक्ष घालावे, ताजाबाद परिसरातील दुकानदारांना त्यांच्या हक्काची दुकाने मिळावीत, प्रशासकांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याचे देखील त्यांनी आवाहन केले.