Home उपराजधानी नागपूर आश्रमशाळांतील जेवणाला टाटा ट्रस्टचा आधार

आश्रमशाळांतील जेवणाला टाटा ट्रस्टचा आधार

69

गडचिरोली / मुंबई  : गडचिरोलीतील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सकस, चांगल्या प्रतीचे व पौष्टिक आरोग्यदायी जेवण मिळावे, यासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने गडचिरोलीमध्ये मध्यवर्ती स्वयंपाकगृह [ central kitchen ]  उभारण्यात येणार आहे. टाटा ट्रस्ट [ tata trust ] व बीपीसीएल यांच्या सहकार्याने सुमारे पाच हजार जणांसाठी जेवण बनवण्याची सोय होणार आहे.

ग्रामीण भागातील शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे आणि पोषणमूल्य असलेले जेवण उपलब्ध व्हावे यासाठी आदिवासी विकास विभागाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ठाणे, डहाणू येथे मध्यवर्ती स्वयंपाकगृह सुरू करण्यात आले होते. त्याच धर्तीवर गडचिरोलीमध्ये स्वयंपाकगृह उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी एकावेळी 5 हजार व्यक्तींसाठी जेवण बनविण्याची क्षमता असलेले अद्ययावत स्वयंपाकगृह उभारण्यात येईल. या स्वयंपाकगृहाचा लाभ परिसरातील 11 आश्रमशाळांमधील व 14 वसतिगृहातील सुमारे 4 हजार 750 विद्यार्थ्यांना होणार आहे. यामध्ये नाष्टा, दोन वेळेचे जेवण व अल्पोपहार तयार करण्यात येईल. हे अन्न विशेष वाहनांच्या माध्यमातून 60 किमी परिसरातील शासकीय आश्रमशाळा [ aashram shala ], इंग्रजी माध्यमाच्या शाळा, वसतिगृहे यांना पुरविण्यात येणार आहे. या स्वयंपाकगृहातील कर्मचाºयांना टाटा ट्रस्टच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्वयंपाकगृह उभारणीचा सर्व भांडवली खर्च हा टाटा ट्रस्ट व बीपीसीएल यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी (csr ) मधून करण्यात येणार आहे. स्वयंपाकगृहाचे कामकाज चालविण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती आणि आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here