पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांतून भरतीसाठी उत्तीर्णतेची गुणमर्यादा घटविण्याबाबतचा प्रस्ताव सादर करा

राजधानी मुंबई

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क मधील पदांच्या भरतीसाठी अंशकालीन कर्मचाऱ्यांना उत्तीर्णतेची गुणमर्यादा 45 टक्क्यावरुन 40 टक्के करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालय येथे पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतील नियुक्ती परीक्षेमध्ये असलेल्या किमान गुणांची अट शिथील करण्याच्या अनुषंगाने बैठक झाली. या बैठकीस आमदार प्रणिती शिंदे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव गीता कुलकर्णी, पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे प्रदेश समन्वयक विठ्ठल व्हनमारे, वैशाली राणे, गफुर शेख, प्रकाश होटकर, अंकिता कोलते आदी उपस्थित होते.

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क च्या पदभरतीमध्ये दहा टक्के आरक्षण लागू असून परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादा वाढवून 55 वर्षे करण्यात आली आहे. परीक्षा देण्याच्या वयोमर्यादेत वाढ झाली मात्र त्या तुलनेत उत्तीर्णतेच्या गुणांमध्ये कपात करणे आवश्यक होते. 45 टक्के किमान गुणांची मर्यादा राहिल्यामुळे अंशकालीन उमेदवारांतून भरावयाची अनेक पदे तशीच रिक्त राहात आहेत, अशी भूमिका संघटनेच्यावतीने मांडण्यात आली.

अंशकालीन उमेदवारांना भरती परीक्षेत गुणांची मर्यादा 45 टक्क्यावरुन कमी करण्याची संघटनेच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करुन त्वरित सादर करावा, असे राज्यमंत्री भरणे यांनी निर्देश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *