नागपूर : कोविड पार्श्वभूमीवर नव्या वर्षाचे [ new year 2021] सर्वत्र साधेपणाने मात्र उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असल्याने बहुतेक नागरिकांनी घरातच थांबून नवीन वर्षाचे स्वागत केले. शहरात अनेकजण फटाके फोडून नव्या वर्षाला सामोरे गेले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नववर्षानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्यात. कोरोना संकटामुळे सन 2020 संपूर्ण जगाकरता अत्यंत आव्हानात्मक होते; परंतु शाश्वत मानवीमूल्य, कोरोना योद्ध्यांचा सेवाभाव, परस्पर स्नेहभावना आदीमुळे देशवासियांनी संकटाला धैर्याने तोंड दिले, असे राज्यपालांनी म्हटले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देताना वैयक्तिक आरोग्यासोबतच, इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले़ उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य, आणि समाधान घेऊन येवो, संपूर्ण जग कोरोनामुक्त होऊन सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी लवकर मिळो, अशा शब्दात त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या़.