Home उपराजधानी नागपूर नागपुरात विधिमंडळाचा कायमस्वरुपी कक्ष सुरू होणे हा ऐतिहासिक क्षण

नागपुरात विधिमंडळाचा कायमस्वरुपी कक्ष सुरू होणे हा ऐतिहासिक क्षण

76

– प्रशासनाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
– सभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी

Nagpur Vidhimandal Kaksha : नागपूर विधानभवनात कायमस्वरुपी कार्यरत विधिमंडळ कक्षामुळे विदर्भाच्या आकांक्षांना न्याय मिळणार आहे. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतर विदर्भासाठी हा दुसरा मोठा ऐतिहासिक क्षण असल्याचे भावपूर्ण उद्गार महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काढले.

नागपूर करारानुसार महाराष्ट्र विधानमंडळाचे वर्षातील एक अधिवेशन नागपूर येथे होत असते. मात्र, अधिवेशन संपल्यानंतर नागपूर येथील विधानमंडळ सचिवालयात कोणतेही कामकाज होत नाही. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पुढाकार घेत याठिकाणी वर्षभर कार्यरत असणारा कायमस्वरुपी कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या कक्षाचे उद्घाटन सोमवारी, 4 जानेवारी रोजी करण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, संसदीय कामकाज मंत्री अ‍ॅड.अनिल परब, क्रीडामंत्री सुनील केदार व्यासपीठावर उपस्थित होते. तर दूरदृश्यप्रणालीद्वारे(आॅनलाईन) महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख सहभागी झाले होते.

अध्यक्ष श्री.पटोले यांनी सांगितले, की लोकशाहीवर विश्वास ठेवणाºया महाराष्ट्रातील जनतेसाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. ज्यांना सभागृहात सहजासहजी प्रवेश मिळत नाही, त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत बसून हा ऐतिहासिक सोहळा अनुभवता येत आहे. लोकशाही अधिकाधिक जनताभिमुख करण्याची ही प्रक्रिया असून आता यापुढे विधानमंडळातील ग्रंथालयही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरपाठोपाठ पुणे येथेही विधिमंडळाचा अशाच पद्धतीचा कक्ष सुरु करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

अनुशेष दूर करण्यासह सर्व प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी हा कक्ष सहाय्यभूत ठरेल. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात अशा पद्धतीच्या उपाययोजना ही काळाची गरज आहे. पुढील काळात कोरोनासारख्या महामारीच्या आकस्मिक परिस्थितीमध्ये सामूहिक सहभागासाठी अशा पद्धतीच्या व्यवस्थेसाठी महाराष्ट्र विधिमंडळ कायम प्रयत्नशील असेल, अशी ग्वाही श्री.पटोले यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला. नागपूर करारामुळे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन घेणे ही अपरिहार्यता आहे. मात्र आता स्थापन झालेल्या कक्षामुळे येथे वर्षभर काम सुरू राहणार आहे. त्यामुळे अधिवेशन अपरिहार्य असले तरी त्यामागची औपचारिकता राहणार नाही. कोरोनासारख्या प्रतिकूल कालावधीतही महाराष्ट्र थांबला नाही. या उद्घाटन सोहळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र कधी थांबणार नाही, हा संदेश दिला गेला आहे. प्रशासनाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी टाकलेले हे पुढचे पाऊल आहे. विदर्भाचे प्रश्न केवळ हिवाळी अधिवेशनापुरतेच मर्यादित न राहता त्यांना सदैव न्याय मिळावा हा यामागील उद्देश आहे. विदर्भ आपल्या हृदयात असून या नव्या निर्णयामुळे हे नाते आणखी घट्ट झाले असून भविष्यात विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही श्री.ठाकरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here