नागपूर : लोकशिक्षणातून समाजसुधारणा व्हावी, यासाठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेली पत्रकारिता आता काळानुरुप प्रयोगशील होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माहिती संचालक हेमराज बागुल यांनी केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालय व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री. बागुल बोलत होते.
समाजात कालानुरुप होणारे बदल पत्रकारिता करताना टिपता आले पाहिजेत. पत्रकाराने जाणिवा संवर्धित करून सामाजिक संशोधनावर भर देत बातमीदारी करणे आवश्यक झाले असून, माध्यमातील नवोदितांनी त्यासाठी मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे. कोणत्याही क्षेत्राची चांगली प्रतिमा तयार करण्याचे काम त्यातील बहुसंख्येने असलेले सकारात्मक घटक करत असतात. त्यामुळे पत्रकारिता करताना नवोदितांनी कामाप्रति आणि स्वत:प्रति आत्मपरीक्षणाची भावना कायम ठेवावी. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे अभिमानाने सांगितले जाते. हा अभिमान सार्थ ठरविण्यासाठी सध्या पत्रकारितेची प्रतिमा बदलण्याची गरज आहे. ही जबाबदारी विद्यमान पिढीवर असल्याचे श्री. बागुल यांनी सांगितले. पत्रकारितेत काम करताना व्यावसायिक नीतीमूल्ये सांभाळणे आणि ती प्रामाणिकपणे ते टिकविण्यासाठी प्रचंड मेहनतीची तयारी ठेवण्याचे आवाहन करून श्री. बागुल यांनी आपल्या पत्रकारितेचे अनुभव यावेळी कथन केले.
पत्रकारिता किंवा जनसंपर्काची यशस्विता ही व्यक्तीला टिकवून ठेवता आली पाहिजे. समाजातील विविध घटकांसोबतचा असलेला संपर्क, ओळख ही त्याच्या यशस्वीतेची पावती असते. पत्रकारितेत काम करताना त्याचे फायदे-तोटे आहेत. ते कोरोनाकाळात अधिक प्रकर्षाने जाणवले असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी, माध्यम समन्वयक अनिल गडेकर यांच्यासह जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुभाष वºहाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
दीप प्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला सहायक संचालक शैलजा वाघ-दांदळे, संजय देशमुख, नरेंद्र्र कुकडे, प्रवीण बागडे, अशोक चिमणकर, शरद बोरकर, आनंद शर्मा, श्रीमती विद्या शर्मा यांच्यासह नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विद्या विभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहायक संचालक शैलजा वाघ-दांदळे यांनी केले. ऐश्वर्या मेश्राम हिने आभार मानले.