माहिती प्रदान प्रक्रियेला गती मिळण्यासाठी डिजिटल सुविधा 

विदर्भ

अमरावती : माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मिळण्याच्या प्रक्रियेत नागरिकांना सुलभता व गती यावी यासाठी राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठातर्फे सॉफ्टवेअर व ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे अपीलार्थींना ऑनलाईन तक्रार दाखल करण्याच्या सुविधेसह मोबाईलवर आपल्या सुनावणीची प्रकरणे पाहण्याचीही सुविधा मिळणार आहे, अशी माहिती आयोगाच्या अमरावती-नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त संभाजी सरकुंडे यांनी दिली.

कोरोना विषाणूची साथ उद्भवल्यानंतर जगभरातील व्यवहार ठप्प झाले होते. त्याला माहिती आयोग देखील अपवाद नव्हते. तेव्हा दूरस्थ पद्धतीने काम करण्याची कार्यपद्धती विकसित करण्याचे प्रयत्न झाले. त्यातून ही प्रणाली विकसित झाली, असे सांगून श्री. सरकुंडे म्हणाले की, सुरूवातीला ई-मेलद्वारे नोटीस पाठवून गुगल मिटवरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावण्या आयोजित करण्यात आल्या. सामान्य नागरिकांचे ई-मेल आयडीच काय तर साधे संपर्कासाठी मोबाईल क्रमांक देखील आयोगाकडे उपलब्ध नव्हते. या समस्येवर मात करण्यासाठी प्रत्यक्ष नोटीस देऊन सुनावणीसाठी बोलाविण्याबाबत संबंधित प्राधिकरणांना सांगण्यात आले. त्यानंतर पुढील टप्पा गाठण्यासाठी सॉफ्टवेअरचे काम पूर्णत्वास नेले.

अमरावती खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील पाचही जिल्ह्यातील सर्व कार्यालयांतील सर्व जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांचा डेटा बेस बांधण्यात आला. यावरून प्रत्यक्ष अ‍ॅप्लिकेशनवर भरलेल्या तपशिलाचे आधारावर अपिलार्थी, जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांना स्वयंचलितपणे नोटीस जाऊन घरच्या घरून मोबाईलवरून सुनावणीला हजेरी लावण्याची सोय करण्यात आली. आदेश सुद्धा घरपोहोच मोबाइलवर उपलब्ध करून देण्यात आले. कोरोनाचे काळात घरच्या घरी ही व्यवस्था झाली. नागरिकांना घरच्या घरी आपल्या मोबाईलवर सुनावणीचे प्रकरणे पाहता येतील, आयोगाकडे महितीबाबत ऑनलाइन तक्रार दाखल करता येईल, आयोगाने पारित केलेले आदेश पाहता येतील, मुद्रित प्रत घेता येईल व माहितीच्या कायद्याविषयी जाणून घेता येईल अशी वैशिष्ट्यपूर्ण अंगे या सॉफ्टवेअरला जोडली गेली आहेत. त्यामुळे हे सॉफ्टवेअर हाताळण्यास सुलभ व उपयुक्त झाले आहे. त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य माहिती आयुक्त श्री. सरकुंडे यांनी केले आहे. आयोगाचे संकेतस्थळ http://www.rti.rtipranali.com:8084/RTI_Web/ असे आहे. यावरील नागरिकांसाठी असलेल्या सुविधा पाहण्यासाठी केवळ क्लिक करून पाहता येतील. त्यासाठी कोणत्याही लॉगीन, पासवर्डची आवश्यकता नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *