Home पूर्व विदर्भ वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची भंडारा सामान्य रुग्णालयाला भेट

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची भंडारा सामान्य रुग्णालयाला भेट

98

BHANDARA KIDS BURNING : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटे आग लागून १० नवजात शिशुंचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या संदर्भाने राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सायंकाळी तातडीने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. रुग्णालयातील यंत्रणेशी चर्चा करून घडल्या प्रकाराबाबत माहिती घेतली.

भेटीत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते तसेच ड्युटीवर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. घटनास्थळी तातडीने पोहोचून उपाययोजना करणाऱ्या अग्निशमन दलाच्या तसेच सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांचे श्री. देशमुख यांनी कौतुक केले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून शासन मृतकांच्या पालकांच्या पाठीशी आहे. घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखाची मदत देण्यात आली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा अहवाल प्राप्त होताच घटनेचे नेमके कारण कळणार आहे. यावेळी त्यांनी आरोग्य उपसंचालकांसोबत चर्चा करुन तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर श्री. देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन या संदर्भाने सविस्तर चर्चा केली. यावेळी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम तसेच आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी व राजा तिडके आदी मान्यवर सोबत होते.

श्री. देशमुख यांनी भंडारा येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपूर चंद्रपूर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांसोबत आढावा बैठक घेतली. तसेच यापुढील काळात अशी घटना कुठेही घडू नये या दृष्टीने सर्वतोपरी उपाययोजना आखण्याच्या तसेच काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here