Home पूर्व विदर्भ भंडारा दुर्घटनेवर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ, मुख्यमंत्री आज येणार

भंडारा दुर्घटनेवर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ, मुख्यमंत्री आज येणार

126

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटला [ new born baby unit ] शुक्रवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीमुळे आणि होरपळून 10 नवजातांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. यातील वाचवण्यात आलेल्या अन्य सात बालकांना सुरक्षित बाहेर काढून प्रत्येकावरील उपचारासाठी स्वतंत्र पथक देण्यात आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज घटनास्थळी भेट देणार असल्याचे वृत्त आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली. शॉट सर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. रात्री कर्तव्यावर असलेल्या नर्स व वॉर्डबॉय यांनी तातडीने खिडक्या, दरवाजे उघडले. या कक्षालगतच्या दुसºया वॉर्डमधील बालकांना  तातडीने हलविल्याने अन्य सात बालकांना वाचवण्यात यश आले. या दुर्घटनेत 10 बालकांचा मृत्यू झाला असून त्यातील तिघांचा आगीत होरपळून तर अन्य सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला आहे. घटनेनंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेसह पोलिस व प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही केल्याने अधिकची जीवितहानी टळली. इतर वार्डातील रुग्णांच्या जीवास धोका पोहोचणार नाही. यासाठी प्रशासनाने जीवाची बाजी लावून याप्रसंगी काम केले. दगावलेल्या बालकांचे मृतदेह शनिवारी सकाळी कुटुंबांच्या स्वाधीन करण्यात आले. पीडित कुटुंबासोबत एक पथक जिल्हा प्रशासनाने सोबत दिलेले आहे. तर या दुर्घटनेतून बचावलेल्या बालकांच्या उपचारात कोणतीही हेळसांड होऊ नये, यासाठी प्रत्येक बालकासोबत एक नर्स व डॉक्टरांचे पथक देण्यात आले आहे. या सर्व बालकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.